प्रभू येशूचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा मूळ आधार आहे. -- रेव्ह फादर सचिन मुन्तोडे.

प्रभू येशूचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा मूळ आधार आहे. -- रेव्ह फादर सचिन मुन्तोडे.

         टिळकनगर (वार्ताहर ):- आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने असहाय्य यातना सहन करून क्रुसावरील मरण स्विकारले. प्रभू येथू हा नीतिमान होता आणि नीतिमानाचा शेवट यातनेत होतो हे त्याला ठाऊक होते. हे विधी लिखित, शास्त्र लेख पुर्ण व्हावा यासाठी तो निरापराध होता त्याचे मरण म्हणजे आपल्या पापांची त्याला शिक्षा होती. प्रभू येशूने मरणावर विजय मिळविला ही जगातील एकमेव ऐत्याहासिक घटना आहे .प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हाच ख्रिस्ती विश्वासाचा मूळ आधार आहे. असे विचार हरेगाव येथील संत तेरेजा चर्चचे सहाय्यक धर्मगुरू रेव्ह.फा. सचिन मुन्तोडे यांनी व्यक्त केले .

          टिळकनगर येथील कॅथोलिक चर्चच्या वतीने ईस्टर सणानिमित्त आयोजित पवित्रमिस्सा बलिदान विधी प्रसंगी भाविकांना उपदेश करतांना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की , मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट नाही तर ख्रिस्ती श्रध्देनुसार मृत्यू नंतरही अनंत सार्वकालिक जीवन आहे याचा अनुभव प्रत्येक ख्रिस्ती लोकांना मिळणार आहे . प्रभू येथूचे पुनरुत्थान म्हणजे सत्याचा असत्यावर , प्रकाशाचा अंधारावर , व ज्ञानाचा अज्ञानवर मिळविलेला विजय आहे. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आपणाला नवजीवन मिळाले आहे .त्यामुळे आपण जीवन जगत असताना दुःख , संकटे , चिंता यांना घाबरून न जाता प्रभू ख्रिस्ता समवेत धैर्याने जीवन जगून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद साजरा करुया.

               याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी एकमेकांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या .प्रायश्चितकाळात आयोजित विविध आध्यात्मिक कार्यक्रमात धर्मग्रामातील विविध ग्रुप, महिला मंडळ, कॅटिकिस्ट व सिस्टर्स यांनी सहकार्य  केल्याबद्दल टिळकनगर कॅथोलिक चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. मायकल वाघमारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्वांना सनाच्या शुभेच्छा दिल्या.